My Laboratory

(1) माझ्या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या केल्या जातील

(2) आपण कमी वेळेत आणि कमी किंमतीत रक्त तपासणी करू शकता

(3)
आपण दिलेल्या पत्त्यावर आपले रक्त संकलित केले जाईल आणि रक्त चाचणी अहवाल आपल्या व्हाट्सएपवर पाठविला जाईल. .

रक्त (Blood)पांढऱ्या पेशी (व्हाइट ब्लड सेल / ल्युकोसाइट)रक्तपट्टिका (ब्लड प्लेटलेट)

 रक्त (Blood)

मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात मुख्यत: वाहकाचे कार्य करणारा एक द्रव म्हणजे रक्त. रक्त लाल रंगाचे असून ते हृदयापासून निघून रक्तवाहिन्यांद्वारे शरीरात फिरते आणि परत हृदयापर्यंत येते. म्हणून रक्ताला प्रवाही किंवा अभिसारी ऊती असेही म्हणतात. रक्तामार्फत शरीरातील पेशींकडे ऑक्सिजन आणि पचनक्रियेत तयार झालेले पोषक पदार्थ वाहून नेले जातात आणि पेशींच्या चयापचयातून निर्माण झालेली अपशिष्टे, कार्बन डायऑक्साइड इ. गोळा केले जातात. शरीराचा कोणताही भाग रक्तपुरवठ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. १६७० मध्ये सूक्ष्मदर्शकाच्या शोधानंतर रक्ताची जटिल रचना माहीत झाली. प्रस्तुत नोंदीत मानवी रक्तासंबंधी माहिती दिली आहे.

प्रौढ मानवी शरीरात सु. ५००० मिलि. रक्त असते. सु. ५००० मिलि. रक्तामध्ये रक्तद्रव सु. ३००० मिलि. व सु. २००० मिलि. रक्त पेशी असतात. रक्त शरीरात वेगवेगळया इंद्रियांमध्ये वितरीत झालेले असून ते सु. २५० मिलि. हृदय, १,३०० मिलि. फुप्फुसे, सु. ५५०मिलि. धमन्या, सु. २,२५० मिलि. शीरा आणि उरलेले यकृत, प्लीहा इ.मध्ये असते.

रक्ताचे रक्तद्रव आणि रक्त पेशी असे दोन मुख्य भाग असतात. रक्तातील रक्तपेशी वेगळ्या केल्यास जो द्रव मागे उरतो त्याला ‘रक्तद्रव’ म्हणतात. रक्तक्लथनानंतर जो द्रव वेगळा मिळतो त्याला ‘रक्तरस’ म्हणतात. रक्तद्रवात सु. ९०% पाणी आणि उरलेल्या १०% पदार्थामध्ये ग्लुकोज, ग्लिसरॉल, मेदाम्ले व ॲमिनो आम्ले असे पचनक्रियेत तयार झालेले पोषक पदार्थ, क्षार, संप्रेरके, जीवनसत्त्वे, चयापचय क्रियांमधून बाहेर टाकलेली अपशिष्टे आणि रक्त पेशी असतात.

रक्तद्रवात मोठया प्रमाणात प्रथिने असल्यामुळे  त्यास ‘प्रथिनांचे कलिली द्रावण’ असेही म्हणतात. रक्तद्रवात अल्ब्युमीन ७%, ग्लोब्युलीन, हिपॅरिन, प्रोथ्राँबीन  व फायब्रिनोजेन ही प्रमुख प्रथिने असतात. अल्ब्युमीन रक्ताचा कलिली दाब नियमित ठेवण्याचे कार्य करते. ग्लोब्युलीन या प्रथिनाद्वारे प्रतिद्रव्ये निर्माण केली जातात. हिपॅरिन या प्रथिनामुळे केशवाहिन्यांतील रक्त गोठण्यापासून रोखले जाते. फायब्रिनोजेन रक्त गोठण्याच्या क्रियेत महत्त्वाचा भाग घेते. रक्तद्रवात यूरिया, यूरिक  अम्ल, क्रिऍटिनीन हे कार्बनी आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांची क्लोराइडे, फॉस्फेटे व सल्फेटे हे अकार्बनी पदार्थही असतात. ऊती व पेशींतून येणारा कार्बन डायऑक्साइड सोडियम बायकार्बोनेटच्या स्वरूपात वाहून नेला जातो.

रक्त पेशीचे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तपट्टिका हे मुख्य घटक आहेत. रक्तातील तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि रक्तपट्टिका अस्थिमज्जेमध्ये निर्माण होतात आणि या प्रक्रियेला रक्तजनन म्हणतात. बालवयात शरीरातील प्रत्येक हाडामध्ये तांबड्या पेशी तयार होत असतात; प्रौढावस्थेत, तांबड्या पेशींची निर्मिती फक्त मोठ्या हाडांमध्ये होत असते.



तांबड्या  पेशी (रेड ब्लड सेल/ इरिथ्रोसाइट) : प्रती १ घनमिमी. रक्तात ४५ लाख – ५५ लाख तांबड्या पेशी असतात. या पेशींचा व्यास ७·५—८ मायक्रॉन असून त्या मध्यभागी दबलेल्या असतात. त्यांची कडा २·२ मायक्रॉन जाड असते. या पेशींमध्ये केंद्रक नसते. साध्या सूक्ष्मदर्शकाखाली ताज्या रक्तातील तांबड्या पेशी पिवळसर हिरव्या रंगाच्या व नाण्यांच्या चवडीप्रमाणे गोळा होताना दिसतात. प्रत्येक तांबड्या पेशीत तिच्या वजनाच्या एकतृतीयांश भाग हिमोग्लोबिन असते आणि त्यामुळे या पेशींना लाल रंग येतो. तांबडी पेशी पटलवेष्टित असून त्यांचे पटल पारगम्य असते. या पटलातून पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, ग्लुकोज व इतर काही पदार्थ सहज आतबाहेर जातात. तांबडी पेशी एवढी लवचिक असते की, तिच्या व्यासापेक्षाही कमी व्यासाच्या केशवाहिनीतून ती वेडीवाकडी होऊन सहज जाऊ शकते आणि योग्य जागा मिळताच पुन्हा ती पूर्ववत आकार घेते. तांबड्या पेशींचा आयु:काल १२० दिवसांचा असतो. त्या सर्व ऊतींपर्यंत हिमोग्लोबिनच्या साहाय्याने श्वसन वायू (ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड) वाहून नेतात. केवळ उंटांच्या तांबड्या पेशींमध्ये केंद्रक असते. तांबड्या पेशीत तंतुकणिका नसतात.



पांढऱ्या पेशी (व्हाइट ब्लड सेल / ल्युकोसाइट) : प्रती १ घनमिमी. रक्तात ७०००–१०००० पांढऱ्या पेशी असतात. त्यांना श्वेत पेशी असेही म्हणतात. पांढऱ्या पेशींना केंद्रक असते व स्वत:हून हालचाल करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे तांबड्या पेशी व रक्तपट्टिका यांपेक्षा पांढऱ्या पेशी वेगळ्या असतात. म्हणून त्यांना पूर्ण पेशी असेही म्हणतात. सर्व पांढऱ्या पेशी अस्थिमज्जेतील रक्तजनन मूलपेशींपासून तयार होतात. शरीराचे संक्रामणांपासून आणि शरीरबाह्य आक्रमणांपासून संरक्षण करण्याचे कार्य पांढऱ्या पेशी करतात. पांढऱ्या पेशींचे प्रमाण शरीरातील रक्ताच्या १% असले तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. रक्तातील पांढऱ्या पेशींच्या संख्येवरून एखाद्या व्यक्तीला रोगाचे संक्रामण झाले आहे किंवा नाही ते लक्षात येते. 

पांढऱ्या पेशींचे वर्गीकरण त्यांच्या संरचनेनुसार कणिकायुक्त पेशी आणि कणिकाविरहित पेशी असे करतात. कणिकायुक्त पेशींच्या पेशीद्रव्यात कणिका (लहान कण) असतात, तर कणिकाविरहित पेशींच्या पेशीद्रव्यात कणिका नसतात. कणिकायुक्त पेशींचे उदासीनरागी पेशी, इओसीनरागी पेशी व आम्लारिरागी पेशी असे प्रकार आहेत. कणिकाविरहित पेंशींचे लसिका पेशी आणि एककेंद्रक पेशी व असे प्रकार आहेत. पांढऱ्या पेशींचे प्रकार लेशमन अभिरंजकाच्या सान्निध्यात या पेशी किंवा कणिका जो परिणाम दर्शवितात त्यानुसार केलेले आहेत. लेशमन अभिरंजक इओसीन (आम्लधर्मी) आणि मिथिलीन ब्ल्यू (आम्लारीधर्मी) या दोन अभिरंजकाचे मिश्रण असते. त्यांपैकी आम्लधर्मी रंगद्रव्य हे पेशीतील आम्लारीधर्मी घटक अभिरंजित करते, तर आम्लारिधर्मी रंगद्रव्य पेशीतील आम्लधर्मी घटक अभिरंजित करते. यानुसार मिथिलीन ब्ल्यू हे केंद्रक व आम्लारीरागी कणिका अभिरंजित करते, तर इओसीन हे इओसीनरागी कणिका अभिरंजीत करते.


उदासीनरागी पेशी (न्यूट्रोफिल) : एकूण पांढऱ्या पेशींच्या तुलनेत या पेशींची संख्या ६०–७०% असते. लेशमन अभिरंजकाच्या सान्निध्यात यांच्या कणिका जांभळ्या दिसतात. या पेशी शरीराचे जीवाणू, कवक यांच्या संक्रापणांपासून संरक्षण करतात. जीवाणूंशी लढायला त्या आघाडीवर असतात; त्या जीवाणूंना गिळंकृत करतात. त्यांनी केलेल्या कृतीमुळे आणि रोगकारकांच्या नाशामुळे पू निर्माण होतो. या पेशींतील केंद्रक ५–७ खंडांचे असते. या पेशी त्यांच्यातील लयकारिका पुनर्नवीकरण करू न शकल्यामुळे काही सूक्ष्मजीव गिळल्यानंतर त्या मृत होतात. या पेशींचा आयु:काल ४-५ दिवस असतो.

इओसीनरागी पेशी (इओसीनोफिल): या पेशींची संख्या एकूण पांढऱ्या पेशींच्या तुलनेत २–४% असते. यांची संख्या दिवसभरात, ऋतुनुसार आणि मासिक पाळीच्या काळात बदलत राहते. अधिहर्षता, परजीवींचे संक्रामण, प्लीहा आणि चेतासंस्था इ.च्या आजारात प्रतिकार करण्यासाठी त्यांची संख्या वाढते. मुख्यत: परजीवींच्या संक्रामणापासून इओसीनरागी पेशी शरीराचे रक्षण करतात. या पेशी अशी रसायने स्रवतात ज्यामुळे अंकुशकृमी व पट्टकृमी इ. मोठ्या आकाराचे परजीवी ज्यांचे भक्षक पेशींद्वारे भक्षण होत नाही, ते मारले जातात. लेशमन अभिरंजकाच्या सान्निध्यात यांच्या कणिका तांबड्या-गुलाबी दिसतात. या पेशींतील केंद्रक दोन खंडांचे असते.

आम्लारिरागी पेशी (बेसोफिल): या पेशींची संख्या एकूण पांढऱ्या पेशींच्या तुलनेत ०·४% असते. लेशमन अभिरंजकाच्या सान्निध्यात यांच्या कणिका निळ्या दिसतात. म्हणून या पेशींना आम्लारिरागी पेशी म्हणतात. या पेशी मुख्यत: बाह्य पदार्थांमुळे निर्माण झालेली अधिहर्षता शमविण्याचे कार्य करतात. केंद्रक दोन किंवा तीन खंडांचे असते. या पेशी हिस्टामीन स्रवतात ज्यांमुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि हिपॅरिन स्रवले जाऊन जखम झालेल्या जागी रक्तप्रवाह वाढतो. हिपॅरिनमुळे रक्त साकळण्याची प्रक्रिया रोखली जाऊन जखम झालेल्या भागात पांढऱ्या पेशींची संख्या वाढते.

लसीका पेशी (लिंफोसाइट): या पेशी रक्तापेक्षाही लसीका संस्थेत अधिक प्रमाणात आढळतात. या पेशींची संख्या पांढऱ्या पेशींच्या तुलनेत ३०% असते. या पेशींचे केंद्रक मोठे असते. त्यांचा आयु:काल एक किंवा अधिक वर्षांचा असतो. त्यांच्या व्यासानुसार त्यांचे लहान लसिका पेशी (७–८ मायक्रॉन) आणि मोठ्या लसिका पेशी (१२–१५ मायक्रॉन) असे प्रकार केले जातात. लहान लसिका पेशींचे बी-लसीका पेशी आणि टी-लसीका पेशी असे प्रकार असतात. दोन्ही प्रकारच्या पेशी शरीरबाह्य घटक ओळखून त्यांना शरीराबाहेर काढून टाकण्याचे कार्य करतात. बी-लसीका पेशी प्रतिद्रव्ये स्रवतात, जी प्रथिनेच असतात, ती ऊतींमधील शरीरबाह्य सूक्ष्मजीवांबरोबर बद्ध होतात आणि त्यांचा नाश करतात. टी- लसीका पेशी विषाणूबाधीत पेशी किंवा कर्करोगग्रस्त पेशी यांना ओळखून त्यांचा नाश करतात किंवा बी-लसीका पेशींद्वारे प्रतिद्रव्ये तयार करण्यासाठी मदत करतात. मोठ्या लसिका पेशीत नैसर्गिक मारक पेशी (नॅचरल किलर सेल) असतात. विविध लक्ष्य पेशींना ठार मारण्याची त्यांच्यात जन्मजात क्षमता असते.

एककेंद्रक पेशी (मोनोसाइट): यांची संख्या एकूण पांढऱ्या पेशींच्या ५–७% असते. त्या हालचाल करू शकतात आणि जेथे संक्रामण होते तेथे रक्तप्रवाहातून पोहोचतात. संक्रामणाच्या जागी पोहोचल्यावर त्याचे बृहतभक्षी पेशींमध्ये रूपांतर होते. या आकारमानाने मोठ्या असून मोठ्या कणांचे किंवा तांबड्या पेशींचे भक्षण करतात. याखेरीज मृत पेशींचा ढिगारा साफ करण्याचे कार्य या पेशी करतात.


रक्तपट्टिका (ब्लड प्लेटलेट) यांना रक्तबिंबिका असेही म्हणतात. या पेशी रक्तातील पेशींच्या तुलनेत आकारमानाने सर्वांत लहान (२ मायक्रॉन व्यास) असतात. परंतु त्यांची संख्या पांढऱ्या पेशींपेक्षाही अधिक (१,५०,००० ते ४,५०,००० प्रती घ.मिमी.) असते. रक्तपट्टिकांमध्ये केंद्रक नसल्यामुळे त्यांचे विभाजन होत नाही. सूक्ष्मदर्शीखाली मध्यभागी कणसमूह दिसतो. त्यांचा आयु:काल १० दिवस असतो. रक्तपट्टिकांचे पेशीपटल नाजूक असते. त्यांच्यात थ्राँबोप्लास्टिन हे प्रथिन असते. रक्तक्लथन क्रियेत त्या महत्त्वाचा भाग घेतात.

रक्ताचा सामू (पीएच्‌) साधारणपणे ७·३५–७·४५ यांच्या दरम्यान असतो. त्यामुळे ते किंचित अल्कधर्मी असते. रक्ताचा सामू ७·३ पेक्षा कमी झाल्यास रक्त तुलनेने आम्लयुक्त बनते आणि ७·४ पेक्षा जास्त झाल्यास अल्कयुत बनते. रक्ताचा सामू ७·३ पेक्षा कमी किंवा ७·७ पेक्षा जास्त झाल्यास अशी व्यक्ती काही तासच जिवंत राहू शकते. आम्लरक्तता किंवा अल्करक्तता उत्पन्न होऊ नये म्हणून रक्तामध्ये बायकार्बोनेट, फॉस्फेट व प्रथिने ही उभयरोधी (बफर) संयुगे असतात. त्यामुळे रक्ताचा सामू नेहमी समस्थितीत ठेवला जातो. समस्थिती ही अशी एक प्रक्रिया आहे जिच्याद्वारे सजीव किंवा त्यांच्या शरीरातील जैविक संस्था बाहेरील पर्यावरणाशी जुळवून घेतात आणि टिकून राहतात. रक्ताद्वारे शरीरांतर्गत स्थिती कायम व स्थिर ठेवली जाते.

फुप्फुसातून हिमोग्लोबीनमार्फत ऑक्सिजन वाहून नेऊन सर्व पेशींना पुरविणे, तसेच पेशींनी बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साइड फुप्फुसाकडे आणणे, पचनमार्गात शोषलेले किंवा शरीरात इतर ठिकाणी तयार होणारे पोषक पदार्थ पेशींना पोहोचविणे, शरीरातील चयापचय क्रियांमधून निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ उत्सर्जन करणाऱ्या इंद्रियांपर्यंत वाहून नेणे, टी- लसीका पेशी, बी- लसीका पेशी, प्रतिद्रव्ये व इतर रोगप्रतिक्षम पदार्थ योग्य ठिकाणी वाहून नेणे आणि शरीरातील निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीचे स्राव योग्य ऊतीपर्यंत वाहून नेऊन शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवणे, ही रक्ताची मुख्य कार्ये आहेत.

रक्ताच्या अभिसरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीरभर वाहून नेली जाते आणि शरीराचे तापमान समान ठेवले जाते. रक्तप्रवाह शरीराच्या पृष्ठभागाकडे वाढला की त्वचेचे तापमान वाढते आणि उष्णता बाहेर टाकली जाते. याउलट, जेव्हा बाहेरील तापमान वाढते तेव्हा त्वचेच्या पृष्ठभागाकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी उष्णतेत होणारी घट रोखली जाते.

रक्ताशी अनेक रोग संबंधित आहेत. तांबड्या पेशींचे रोग असल्यास निरुत्साह, श्वास घेण्यास अडथळा, मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्यामुळे लक्ष केंद्रित होण्यात अडचण, थकवा आणि हृदयाचे जलद ठोके अशी लक्षणे दिसून येतात. यांमध्ये पांडुरोग (ॲनेमिया) या रोगाचा उल्लेख होतो. तांबड्या पेशीतील आर्यनचे (लोह) प्रमाण कमी झाल्यामुळे हा रोग होतो. याचा एक प्रकार म्हणजे सिकल सेल ॲनेमिया. या जनुकीय विकारात तांबड्या पेशीतील हिमोग्लोबीन रेणूंचा आकार विळ्यांसारखा होतो आणि पेशी ताठ व वाकड्या होतात. अशा तांबड्या पेशी ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाहीत. तसेच त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकत असल्यामुळे इंद्रियांचा रक्तपुरवठा कमी होतो.

रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या सारखी बदलत असते. सकाळी ती कमी, तर दुपारी वाढलेली आढळते. शारीरिक श्रम, मासिक पाळी, गर्भारपण, प्रसूतीची वेळ इ.मुळे पांढऱ्या पेशींची संख्या तात्पुरती वाढते. पांढऱ्या पेशींची अपसामान्य वाढ किंवा न्यूनता, एकूण प्रमाणातील बदल, आकार बदल हे शारीरिक विकृतीचे दर्शक असतात. ल्यूकेमिया म्हणजे पांढऱ्या पेशींचा अर्बुद झाल्यास पांढऱ्या पेशींची संख्या अपसामान्य वाढते व (५,००,००० ते १०,००,००० पर्यंत) अपरिपक्व पांढऱ्या पेशी शरीरभर साठल्या जातात. एकदा ही विकृती सुरू झाली की वाढत जाते आणि मारक असते.

केशवाहिनी फुटल्यास रक्त बाहेर न पडू देण्याच्या व रक्त साकळणे या क्रियांमध्ये रक्तपट्टिका महत्त्वाचे कार्य करतात. रक्ताची गुठळी झाल्यामुळे रक्तस्राव थांबतो. तसेच सूक्ष्मजीवांचा जखमेतून होणारा प्रवेश रोखला जातो.  काही वेळा रक्तपट्टिकांची संख्या अतिशय वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साकळून मृत्यू होउ शकतो. काही वेळा एकूण रक्तपट्टिकांची संख्या कमी होते. रक्तपट्टिका ५०,००० पेक्षा कमी होताच रक्तस्राव होतो व ती १०,००० पर्यंत घटल्यास बहुधा मारक ठरू शकते.

Post a Comment

0 Comments